गोंदिया - आमगाव तालुक्यात घाटटेमणी गावात लग्न समारंभ आटोपल्यानंतर स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तब्बल २०० लोकांच्या जेवणाची तयारी सुरू होती. याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली. त्यानुसार पोलीस विभागातर्फे सदर ठिकाण जाऊन पाहणी केली असता, पाहुणे लोकांसाठी जेवण तयार करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यामुळे आपल्या स्टाईलने जेवण बनवणाऱ्यांना दम दिला. तसेच आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना मोठ्या संख्येने एकत्र येण्यासाठी मज्जाव केला आहे. तसेच आता महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असले तरीही लोकांना एकत्रित आणण्यासाठी असे कार्यक्रम अनेक भागात सुरू आहेत.