गोंदिया- शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या पैकनटोली पिंडकेपार या परीसरात बनावट दारू च्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. यात बनावटी दारूसह १२ लाख ५४ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दोन आरोपींना अटक ही करण्यात आले आहे. श्याम उर्फ पीटी रमेश चाचेरे यांच्या मालकीच्या गोदामात बनावटी दारू तयार करण्याचा हा साठा सापडला आहे.
गोंदिया शहरातील पैकनटोली येथे अवैधरीत्या बनावट दारू तयार करण्याचा कारखाना असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेवरून गुन्हे प्रगटीकरण शाखेने पैकनटोली येथे श्याम चाचेरे याच्या मालकीच्या घर आणि गोदामावर छापामारी केली. यावेळी गोदामात गोवा बनावटची ४४ सीलबंद दारूचे बॉक्स आढळले. या दारूची किंमत २ लाख २१ हजार ७६० रुपये इतकी आहे.
गोंदियात बनावटी दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा पोलिसांनी या दारू जप्तीसह चारचाकी मालवाहक वाहन, बनावट दारू तयार करण्याकरिता वापरण्यात येणारे आणि रासायनिक द्रव्याने भरलेले प्लास्टिक कॅन, प्रत्येक कॅनमध्ये २० लिटर रासायनिक द्रव्य अशा एकूण ७०० लिटर द्रव्याच्या ३५ कॅन, रासायनिक द्रव्य वापरलेल्या ४७ रिकाम्या प्लास्टिक कॅन, ७५ प्लास्टिक पिशवीत असलेल्या ३०० रिकाम्या काचेच्या बॉटल्स, दारू साठविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या २५० रिकाम्या प्लास्टिक बॉटल्स, दारू बॉटल सील करण्याकरिता वापरण्यात येणारे ४ हजार ५०० झाकन, ७ हजार ९८० स्टीकर, एक दुचाकी, ड्रम, खर्डा, मोबाईल हॅण्डसेट असा एकूण १२ लाख ५४ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी श्याम उर्फ पीटी रमेश चाचेरे ३४ वर्ष रा. बाजपाई वॉर्ड गोंदिया, व त्याचे साथीदार महेंद्रसिंग उर्फ मोणू उपेंद्रसिंग ठाकूर (२९ वर्ष रा. श्रीनगर बजापाई चौक) आणि प्रसन्न उर्फ टॅटू संजय कोतरुल(२४ वर्ष रा. श्रीनगर मालवी वॉर्ड गोंदिया) यांच्या विरूद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.