गोंदिया- जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तिरोडा पोलिसांनी कार्यवाही करत ग्राम रामाटोली सिल्ली येथे छापेमारी केली. या ठिकाणी एकाच घरात चार दारू निर्मितीच्या भट्ट्या सुरू होत्या. यावर कारवाई करत पोलिसांनी तब्बल 4 लाख 6 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संजय सोविंदा बरेकर (वय 35 रा. रामाटोली सिल्ली) याला अटक करण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड व पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे हे मंगळवारी आपल्या स्टाफसह पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना गोपनीय सूत्रांनी माहिती दिली की, रामाटोली सिल्ली येथे संजय सोविंदा बरेकर हा हातभट्टीने दारू गाळून विक्रीचा व्यवसाय करीत आहे. या माहितीवरून पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेवून संजय बरेकर याचे घर गाठले व त्याची चौकशी केली. तसेच त्याची घरझडती करायचे असल्याचे सांगितल्यावर त्याने नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये 4 दारू भट्ट्या सुरू असल्याचे आढळून आले.