गोंदिया - भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी महत्वाचा सण आहे. गरीब असो व श्रीमंत, प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकतीनुसार सण साजरा करत असतात. परंतु, यावर्षी गोंदिया पोलीस हे जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागात पसरलेल्या 51 गावातील आदिवासी नागरिकांसह दिवाळी साजरी करणार आहेत. या 51 नक्षल प्रभावित गावांची लोकसंख्या 10 हजार 976 आहे.
गोंदियातील नक्षल प्रभावित 51 गावातील आदिवासींसोबत पोलीस करणार दिवाळी साजरी
यावर्षी गोंदिया पोलीस हे जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागात पसरलेल्या 51 गावातील आदिवासी नागरिकांसह दिवाळी साजरी करणार आहेत.
या आदिवासी गावांमध्ये शिक्षण घेणारी मुले-मुली व इतर आदिवासी लोक हे अत्यंत हलाखीच्या स्थितीत आहेत. असे आदिवासी आपले व आपल्या कुटूंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असताना अधिकतर वेळी अर्धनग्न अवस्थेत त्यांना रहावे लागते. एकीकडे आधुनिक युगात विकासाची गती वाढत असताना दुसरीकडे आदिवासी भाग अद्याप मागासलेलाच आहे. या समाजाला मूलभूत सुविधांची गरज आहे. प्रेमाची आवश्यकता आहे. या बाबींकडे लक्ष देत जिल्हा पोलीस विभागाद्वारे आदिवासी बांधवांसह दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी नागरिक, त्यांच्या मुलांना मदत मिळावी, यासाठी पोलीस विभागाद्वारे उल्लेखनीय पुढाकार घेतला आहे.