गोंदिया - इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कबरडे मोडले जात आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा दर हा 90 रुपयांवर पोहोचला आहे. गोंदियात मे महिन्यात आतापर्यंत एकूण 14 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. 4 मेपासून इंधनाच्या दरात वाढ सुरू झाली. 29 मेपर्यंत पेट्रोलचा दर हा 3.46 रुपये प्रतिलिटरने तर डिझेलचा दर हा 4.36 रुपये प्रतिलिटरने वाढला आहे. गोंदियात पेट्रोलच्या दराने 16 मेपासून शंभरी पार केली आहे. पेट्रोल 101 रुपये 42 पैसे, तर डिझेल 91 रुपये 96 पैसे झाले आहे. पेट्रोल दर लिटरमागे 25 पैसे, तर डिझेल दर 29 पैशाने वाढ करण्यात आल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जाहीर केले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील परभणीत पेट्रोलचे दर आधीच शंभरीपार गेले होते.
संपूर्ण भारतात वन नेशन वन टॅक्स आहे, मात्र पेट्रोल व डिझेलच्या संदर्भात असे दिसत नाही. राज्यात असो वा देशात सगळ्या ठिकाणी पेट्रोल व डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. राज्यात बघितले तर प्रत्येक जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचे दर वेग वेगळे आहेत. अनेक जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. लोकांची मागणी आहे की ज्याप्रमाणे देशात वन नेशन वन टॅक्स आहे, त्याचप्रमाणे पेट्रोल व डिझेलचे दर एकच असावे.