गोंदिया- जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील निसर्गरम्य वनाने नटलेल्या भागात ब्रिटिशकालीन हाजराफॉल धबधबा वसलेला आहे. मुसळधार पावसामुळे हा धबधबा ओसांडून वाहू लागला आहे. मात्र, कोरोनामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी खुला नसल्याने पर्यटकांची निराशा होत आहे. तर धबधब्यातील पर्यटनावर परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, तो सुद्धा बंद असल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे, शासनाने धबधबा पर्यटनासाठी खुला करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व लोक व वन व्यवस्थापन समितीने केली आहे.
जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातून जाणाऱ्या मुबई-हावडा रेल्वे मार्गावरील कुवाढास नाल्याला अडवून ब्रिटिशकालीन इंजिनिअर हाजरा यांनी १९११ साली या धबधब्याची निर्मिती केली होती. तेव्हापासून या धबधब्याला हाजराफॉल असे नाव देण्यात आले. या धबधब्याचा उपयोग पर्यटनासाठी करता यावा व त्यातून या भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वन विभागाने गावातील लोकांची एक वन व्यवस्थापन समिती तयार केली होती. व या ठिकाणी आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.