गोंदिया- आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला बंद करण्याची घोषणा महाआघाडी सरकारच्या शिक्षणमंत्र्याने केली आहे. या निर्णयाला नाराज होवून हिराडामाली येथील पालक व शाळा समितीच्या सदस्यांनी आज भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले आहे. त्याचबरोबर, शाळे समोर शासनाच्या विरोधात प्रदर्शन करत पालकांनी शिक्षकांना शाळेत जाण्यासही रोखले आहे.
फडणवीस सरकारच्या मागील कार्यकाळात माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जिल्ह्या परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील ८३ जिल्हा परिषद शाळा या मंडळाशी जोडण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर या शाळांचे नाव भारतरत्न अटलबिहारी वाजपयी असे ठेवण्यात आले होते. या ८३ शाळांमध्ये जिल्ह्यातील २ जिल्हा परिषद शाळांचा देखील समावेश आहे. परंतु, २६ फेब्रुवारीला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या मंडळाला बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे, जिल्ह्यातील गोरेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या हिराडामाली येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा जाण्याची शक्यता आहे.