गोंदिया - जिल्ह्यात 29 लाख क्विंटलपर्यंत रब्बीच्या पिकाचे उत्पादन निघाले आहे. मात्र आजपर्यंत 1 क्विंटलही धानाची खरेदी झालेली नाही. आज घडीला प्रशासनानुसार खरेदी केंद्रांची मर्यादा तीन ते चार लाख क्विंटल धान खरेदी करण्याची आहे. किमान 25 लाख क्विंटल धान 15 दिवसात खरेदी करणे अपेक्षित आहे. मात्र शासन, प्रशासनाकडे धान खरेदीची कोणतीही यंत्रणा दिसत नाही. धान खरेदी होणार की नाही? हा प्रश्न आहे. कोरोना व धान खरेदीवर सरकार तोंडघशी पडले आहे', असे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते काल (26 मे) गोंदिया जिल्ह्याच्या दौर्यावर असताना माध्यमांशी बोलत होते.
दौऱ्यादरम्यान फडणवीसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन कोरोना संदर्भात माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धान खरेदी व कोरोना संदर्भात आढावा घेतला.
'आघाडी सरकार सर्वस्तरावर अपयशी'
'राज्यातील आघाडी सरकार सर्वस्तरावर अपयशी ठरले आहे. केवळ फसव्या घोषणा करणे हे सरकारचे काम आहे. एकही घोषणा शासनाला पूर्ण करता आली नाही. शासनाने 1 मे पासून धान खरेदीसाठी सातबारा नोंदणी सुरू केली. यावरही शेतकर्यांनी नोंदणी केली म्हणजे धान खरेदी केलीच पाहिजे हे सक्तीचे नाही, असे राज्य सरकारने लिखीत निर्देश दिले. हे सर्वथा चुकीचे आहे. धानाची संपूर्ण खरेदी व निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जातो. या प्रक्रियेसाठी राज्य सरकारला केवळ यंत्रणा उभारायची असते', असे फडणवीस म्हणाले.