गोंदिया - जिल्ह्यात कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेली एक तरुणी आढळली आहे. इजिप्तवरून एक २० वर्षीय तरुणी गोंदियात आली होती. तिला गुरुवारी गळ्यामध्ये त्रास जाणवत असल्याने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिच्या रक्ताचे नमुने पाठवण्यात आले असून शुक्रवारी त्याचा अहवाल हाती येणार आहे. कोरोनाची लागण झाली आहे की, नाही हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजणार आहे.
दरम्यान, देशभरात केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळून आल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. केरळच्या तिरुवअनंतपूरम, थ्रिस्सूर आणि कन्नूर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. यामधील दोघे दुबई आणि कतारमधून परतले होते.