गोंदिया- तालुक्यातील मुंडीपार या गावाजवळ ट्रकच्या धडकेत एक मोटरसायकल चालकच्या जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज दुपारच्या वेळी घडला. रवी गुलाब राणे (रा.सेजगाव खुर्द) असे धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, चालक फरार - गोंदिया
गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून चालक फरार झाला आहे.
रवी हा पाहुण्यांना घेण्यासाठी मुंडीपार बस स्टँडवर आपल्या मोटरसायकल (एम-एच-३१-एफ-डी ६७०८) ने जात असताना समोरून विरुद्ध दिशेने येणारा ट्रक (क्रमांक सी-जे-०७-सी-ए-५३१४) ने धडक दिल्याने रवीचा जागीच मृत्यू झाला. ट्रकमध्ये धान भरलेला असून तो गोंदियाहून मुंडीपार येथील एमएडीसीकडे जात होता.
अपघात होताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी ट्रक चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक चालकाने घटना स्थळावरून पळ काढली. यावेळी गावकऱ्यांनी ट्रकची तोडफोड केली. तसेच ट्रकला आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ट्रकला लावलेल्या आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे ट्रकमध्ये भरलेल्या धानाचे नुकसान झाले नाही.
दरम्यान, ट्रकचालकाविरोधात गंगाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. तर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.