गोंदिया -आपल्या गावी होळी करायला आलेल्या मजुराने एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून ही हत्या करण्यात आली आहे. निलेश धनसिंह लिल्हारे (रा. बिंझली, ता. सालेकसा) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. एका मजुराने आपल्या दोन साथीदारांसह ही हत्या केली. यानंतर तिन्ही आरोपींना सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे.
बिंझली गावातील मृत निलेश धनसिंह लिल्हारे आणि आरोपी पन्नालाल भरतलाल लिल्हारे हे दोन्हीही मागील ४ महिन्यापासुन हैदराबाद येथे एका बांधकाम कंपनीत कामाला होते. एका साईटवर मजुराचे काम करत असताना निलेश आणि पन्नालाल यांच्यामध्ये भांडण झाले होते. भांडणात निलेशने पन्नालालला मारहाण केली. यानंतर गावी पळ काढला होता. त्यामध्ये पन्नालालच्या चेहऱ्याच्या एका भागाला फ्रॅक्चर सुद्धा झाले होते. यानंतर पन्नालाल हा होळी सणानिमित्ताने गावी आला होता. मात्र, त्याने जुन्या भांडणाचा राग मनात ठेवला होता. आरोपी पन्नालालने प्रवीण ढेकवार आणि प्रकाश भरतलाल लिल्हारे या आपल्या दोन मित्रांबरोबर मृत निलेश याला गावातील चौकात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास अडवले. यावेळी त्याच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.