गोंदिया -कुपोषण मुक्तीसाठी सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु, कुपोषण कमी होण्याऐवजी ते वाढतच चालल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. गोंदिया शहरासह ग्रामीण भागातही कुपोषितांचा आकडा वाढत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कुपोषित मुलांमध्ये वाढ झाल्याची माहिती बालविकास प्रकल्पातर्फे देण्यात आली आहे. सध्या कुपोषित बालकांची संख्या ९८ वर पोहोचली आहे. वाढती आकडेवाढ बघता विभागासाठीच नाहीतर समाजासाठीही हा चिंतेचा विषय झाला आहे.
भारताला कुपोषणमुक्त करायचे आहे, असे नेतेमंडळी म्हणत असतात. परंतु, कुपोषणाचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. गोंदिया शहरात ८२ तर तिरोडा शहरात १५ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. या अंगणवाडी केंद्रामध्ये ९० सेविका आणि ९१ सहायिका कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ६ महिन्यांपासून ३ वर्षांच्या बालकांना घरपोहोच पौष्टिक आहार, ३ वर्षांपासून ६ वर्षांपर्यंतच्या बालकांना अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहार दिला जात आहे. कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी लाभार्थी मुलांना घरी कच्चा आहार पोहोचविण्यात येत असून एका मुलापाठीमागे २१० रुपये खर्च करण्यात येत आहे. तसेच वेळोवेळी वजन व आरोग्य तपासणी करून संबंधित मुलांच्या पालकांना मार्गदर्शन केले जात आहे.