गोंदिया- मृतदेह जाळण्यासाठी वन विभागाच्या आगारात लाकडे नाहीत. शहरात पर्यायी सुविधा नाही. विद्युत शवदाहिनी नाही. मग मृतदेहाचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी मृतदेह चक्क वन विभागाच्या कार्यालयासमोर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (९ जून) दुपारच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे वन विभागातील कार्यालयात खळबळ उडाली.
अर्जुनी-मोरगाव येथील नरेश तरजुले या युवकाचे निधन झाले. त्याच्या मृतदेहावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. स्थानिक स्मशानभूमीत विद्युत शव दाहिनीची सुविधा नाही. यामुळे वन आगारातून लाकडे विकत घेऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. नरेशचे पार्थिव वन विभागाच्या कार्यालयात आणल्यानंतर आप्तेष्टांनी वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत दुर्गे यांनी आपल्या आगारात लाकडाचा साठा नसल्याने सांगत लाकडे नावेगबांधच्या आगारातून आणण्याचा सल्ला दिला.
नावेगबांधचे आगार त्या ठिकाणाहून १५ किलोमीटर अंतरावर आहे. तिथून लाकडे आणणे सर्वसामान्य कुटुंबीय तरजुले यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी नरेश याचे पार्थिव वन विभागाच्या कार्यालयासमोर आणून ठेवला. यामुळे वन विभागाच्या कार्यालयात खळबळ उडाली.