गोंदिया -अतिसंवेदनशील व नक्षलवाद्यांचा 'रेस्ट झोन' म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात नेहमी नक्षलवाद्यांच्या कारवाया व हालचाली दिसून येतात. सध्या जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे चार दलम सक्रीय आहेत. १ मे १९९९ला गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. गेल्या २० वर्षात जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या १३४ हिंसक कारवाया झाल्या आहेत. यामध्ये सामान्यनागरिकांसह २२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. परंतू २०१९ व २०२० या एक वर्षाच्या काळात लक्षलवाद्यांकडून एकही कारवाई झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. विविध माध्यमातून नक्षलग्रस्त क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती मेळावे, रोजगार मेळावे व सर्च ऑपरेशन हाती घेऊन जिल्हा पोलीस नक्षलवाद्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत आहेत. पोलिसांना यात यश प्राप्त झाल्याचे दिसत आहे. तीन आडवाड्यांपूर्वीच नक्षलवाद्यांकडून नक्षली सप्ताह पाळण्यात आला. मात्र, या दरम्यान कोणत्याच प्रकारची हिंसक घटना त्यांनी घडवून आणली नाही.
पोलीस देत आहेत तरुणांना रोजगार -
२०१९ ते २०२० या वर्षात गोंदिया पोलीस नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहेत. तरुणांसाठी रोजगार मेळावांचे आयोजित केले जात आहे. त्यामुळे नक्षलग्रस्त क्षेत्रातील तरुण आता नोकरीकडे वळत आहेत. परिणामी नक्षली कारवायांमध्ये घट झाली आहे. हे तरूण आता चळवळीला फाटा देत नक्षलविरोधी मोहीमेमध्ये पोलिसांना साथ देत आहेत.
नक्षलवादी करत आहेत आत्मसमर्पण -
महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया पाहायला मिळतात. विकासाच्या कामात अडथळा आणण्याचे काम नक्षलवाद्यांकडून केले जाते. नक्षलवादी व पोलीस यांच्या दरम्यान असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला नेहमी दहशतीच्या सावटात जीवन जगावे लागते. आता ही स्थिती बदलत आहे. मागील काही दिवसांपासून नक्षलवादी पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण करत असल्याने नक्षल चळवळीला चांगलाच हादरा बसला आहे.