गोंदिया - महाशिवरात्रीनिमित्त गायमुख तसेच प्रतापगड येथील यात्रेत सहभागी होण्यासाठी यात्रा करणाऱ्या प्रवाशांची सुविधा लक्षात घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराकडून विशेष १४ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस दर अर्ध्या तासाने गोंदिया आगारातून सुटणार आहेत.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गायमुख तसेच गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध असून महाशिवरात्रीनिमित्त येथे दरवर्षी यात्रा भरते. यात्रेत हजारो संख्येने येणाऱ्या भाविकांना होणारा त्रास लक्षात घेता एस.टी. आगाराने दर अर्ध्या तासाला बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या यात्रेत गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह लगतच्या अन्य जिल्ह्यातील भाविक महादेवाच्या दर्शनासाठी अगत्याने हजेरी लावतात. मात्र, दोन्ही स्थळ रेल्वे मार्गावर नसल्यामुळे भाविकांना बसने प्रवास करावा लागतो. ही बाब लक्षात घेत गोंदिया आगाराने जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी महाशिवरात्री निमित्त २१ फेब्रुवारीला १४ बसेसची व्यवस्था केली आहे. यातील ९ बसेस गायमुखासाठी असून सकाळी ५:३० ते रात्री ९ दरम्यान दर अर्ध्या तासाने फेरी मारणार आहेत.