गोंदिया - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात उत्तम कार्य केले आहे. अनेक अडचणी असल्या तरी ही चुका काढण्याची वेळ नाही तर नागरिकांना दिलासा देण्याची वेळ आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक अनुभव मिळाले आहेत. त्यातून आपल्याला पुढे सुधारणा कशा करता येतील यासाठी काम करणे गरजेचे आहे', असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. ते आज (15 मे) गोंदियात पत्रकारांशी बोलत होते. तर, नुकतीच राज्यपालांची घेतलेली भेट ही राजकीय नसून फक्त सदिच्छा भेट होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंचे कोरोनावर उत्तम कार्य- प्रफूल्ल पटेल मोदींबद्दल बोलणे टाळले
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्र सरकार कोरोना मृतकांचे आकडेवारी लपवत असल्यासंदर्भात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून आरोप केला. यावर पटेल म्हणाले, की 'बरं झालं फडणवीसांनी फक्त सोनिया गांधींना पत्र लिहिले. महाराष्ट्र सरकार कोरोना मृतांचे आकडे लपवते की देशातील इतर राज्य कोरोना मृतकांचे आकडे लपविते. हे तपासण्याची गरज आहे', असे त्यांनी म्हटले. दरम्यान, त्यांनी पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदींबद्दल त्यांनी बोलणे टाळले. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर कोरोना हे मोदी सरकारचे अपयश आहे का? यावर बोलू, असे सांगितले.
'ही वेळ टीका करण्याची नाही, तर...'
'गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. ऑक्सिजन, औषधे आणि बेडचीसुध्दा समस्या नाही. जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये पुन्हा १०० ऑक्सिजन बेड वाढविण्यात येतील. तसेच देवरी, आमगाव, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट उभारण्यात येणार आहेत. गोंदिया येथे पुन्हा एक ऑक्सिजन सिलिंडर रिफिलींग प्लांट उभारण्यात येणार आहे. स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आहे. मी वेळाेवेळी प्रशासनाच्या संपर्कात आहे. रोज परिस्थितीचा आढावा घेत आहे. ही वेळ टीका करण्याची नाही, तर संकटाशी एकजुटीने लढण्याची आहे', असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
'शेतकऱ्यांचा बोनस लवकरच मिळणार'
'कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. सरकारच्या तिजोरीतसुध्दा ठणठणाट आहे. मात्र, संकट काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या बोनसची रक्कम येत्या १५ दिवसात दिली जाईल. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीसुध्दा चर्चा केली आहे. त्यांनीसुध्दा सकारात्मकता दाखविली आहे', असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले.
हेही वाचा -देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्याचे धाडस करावे - नाना पटोले