गोंदिया - गेल्या ५ वर्षात फडणवीस सरकारने ५ लाख कोटींचे कर्ज घेऊन राज्याला विकण्याचे पाप केले आहे. राज्याचे शैक्षणिक, औद्योगिक व आरोग्यविषयक जे देशपातळीवर नाव होते, ते संपविण्याचे पाप फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक केले आहे. या सगळ्यांचा जाब आम्ही मजबूत विरोधी पक्ष म्हणून या सरकारला विचारणार आहोत. यावेळी आमचे संख्याबळसुध्दा वाढलेले आहे. त्यामुळे या सरकारला आता जनतेची फसवणूक करण्यापासून आम्ही वाचवू आणि महागाईच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरू, असे काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले म्हणाले.
खासदार झाल्यानंतर गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी आली. त्यानंतर नागपूर येथील लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केल्याने साकोली विधानसभा मतदारासंघाकडे लक्ष देण्यात थोडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, १० वर्ष अंतर पडल्याने मतदारांशी थोडीशी नाळ तुटली. त्यामुळे माझ्या विरोधात लढणाऱ्या उमेदवारांना याचा लाभ मिळाला व ते लढतीत आले. नाहीतर मी बांधणी केलेल्या साकोली मतदारसंघात नुसता फार्म भरला तरी लाखांच्यावर मतांनी निवडून येण्याइतपत माझी कामगिरी होती, असे पटोले म्हणाले.
हेही वाचा - सांस्कृतिक ठेव्याचे जतन व्हावे या उद्देशातून 'दिवाळी पहाट'च्या कार्यक्रमाचे आयोजन
माझ्या सहकार्यामुळेच आमदारकी भोगत असलेल्यांनी माझ्या विरोधात लढताना पैशांचा महापूर साकोली मतदारसंघात वाहिला आणि अखेर साम, दाम, दंड, भेद वापरून प्रयत्न केले. मात्र, जनतेने ते सुध्दा हाणून पाडले. अशा पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकविण्याकरता आता मी पण समाजकारणातून शुध्द राजकारणाकडे मोर्चा वळविणार आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अत्यंत गरजेचे असून त्याकरिता कामाला लागलो आहे. लवकरच याचे परिणाम दिसून येणार असल्याचे मत पटोले यांनी मांडले.
गोंदियातील काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले गोपलदास अग्रवाल यांना परत घेणार का? या प्रश्नावर पटोले म्हणाले की, नाही! त्यांना आता काँग्रेसची गरज नाही तसेच काँग्रेसलाही त्यांची मुळीच गरज नाही. त्यांची पोकळी मी लवकरात लवकर भरून काढणार असून लवकरच नव नेतृत्व गोंदियात दिसणार आहे. प्रफुल्ल पटेलांनी गोंदियातील अपक्ष उमेदवाराला केलेल्या मदतीचे हे अशा पध्दतीच्या गलिच्छ राजकारणामुळेच त्यांना दोन्ही जिल्ह्यात जनतेचा नेता होता आले नाही. त्यांनी आघाडी धर्म पाळत काँग्रेस उमेदवारांच्या मागे आपली शक्ती उभी करायला हवी होती. भविष्यात त्यांनाही असेच फळ मिळणार असे ते म्हणाले.