गोंदिया- वाढत्या तापमानासोबतच आता गावोगावी पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातही असेच चित्र आहे. याठिकाणी गावातील विहिरींनी तळ गाठला असून, नगर पंचायतीच्या माध्यमातून टँकरद्वारे एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर याच तालुक्यात सुरु असलेल्या राज्य महामार्गाच्या कामावर हजारो लिटर पाण्याचा वापर करण्यात येत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात पाण्याची पातळी खालावली आहे. तर या तालुक्यातील अनेक गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र, काही बोअरवेल्सला अजूनही पाणी असल्यामुळे ग्रामस्थ त्याचा वापर करीत आहेत. यामध्ये लहान मुले व महिलांची चांगलीच फरफट होत आहे.
आज गोरेगाव तालुक्यातील प्रभाग क्रमांक १ मधील श्रीरामपूर व प्रभाग क्रमांक ५ मधील हलबीटोला या दोन प्रभागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. त्यामुळे याठिकाणी दोन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हा पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
गोंदिया जिल्ह्याला इतिहाडोह धरणातून पाण्याचा पुरवठा होत असतो. मात्र, सध्या या धरणात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे. तर गोरेगाव तालुक्यातील कालीसराड या धरणात केवळ ७ टक्के पाणी शिल्लक असल्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई भीषण होत चालली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मे महिन्याच्या अंतपर्यंत ही स्थिती अजून भीषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर जिल्हा प्रशासन काय तोडगा काढते? आता याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.