गोंदिया - अवघ्या दोन ते तीन दिवसांवर येवून ठेपलेल्या लग्न कार्यक्रमासाठी कुटुंबात लगबग सुरू होत. मात्र लग्नाच्या धामधुमीत असणाऱ्या घरावर अचानक सुतकी कळा आली. रविवार (१७ मे) पासून बेपत्ता तरुणाचा तारांच्या सहाय्याने हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. हा मृतदेह लोधीटोला-विहिरगाव या मार्गावरील शेतशिवारात आढळला. राकेश शोभेलाल दुधबुरे (२५ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे राकेशचे लग्न ठरले असून दोन ते तीन दिवसांवर त्याचे लग्न येऊन ठेपले होते.
धक्कादायक.. लग्नाच्या दोन दिवसापूर्वीच तरुणाची हत्या, हात-पाय तारांनी बांधून मृतदेह टाकला शिवारात - गोंदियात तरुणाचा खून
गोंदियात अवघ्या दोन-तीन दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या तरुणाची हत्या झाल्याने खळबळ माजली आहे. तरुणाचा मृतदेह लोधीटोला-विहिरगाव या मार्गावरील शेतशिवारात आढळला. सेंट्रिंगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या तारांनी त्याचे हातपाय बांधलेले होते.
लोधीटोला येथील राकेश दुधबुरे हा रविवारी रात्री नियमितप्रमाणे जेवण करून घराबाहेर फेरफटका मारण्याकरीता गेला. मात्र, उशिरापर्यत तो घरी परतलाच नाही. सोमवारी त्याचा मृतदेह लोधीटोला-विहिरगाव मार्गावरील शेतशिवारात आढळून आला. सेंट्रिंगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या तारांनी त्याचे हातपाय बांधलेले होते. राकेशची हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच तिरोडा पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास तिरोडा पोलीस करत आहे. विशेष म्हणजे राकेशचे काही दिवसांपूर्वी साक्षगंध झाले होते. तसेच त्याचे लग्नही ठरले होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे लग्न कार्यक्रमाच्या उत्साहावर विरजन पडले होते. तरी आगामी दोन-तीन दिवसात त्याचे लग्न उरकण्याचे नियोजित होते.