गोंदिया :मनाने तरुण असलेल्या एका धावपटूने कमाल केली आहे. मुन्नालाल यादव असे या धावपटूचे नाव आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी ३ सुवर्णपदके पटकावली असून त्यांची दुबई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आज त्यांचे वय जवळपास ८१ वर्षाचे आहे. मात्र आजही ते या वयात व्यायाम करतात. त्यांची जिद्द आणि चिकाटी, त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे.
३ सुवर्णपदके पटकावली :अनेक नागरिकांना ७०-७५ वयानंतर हालचाल करण्यासाठी घ्यावा लागतो. मात्र, मुन्नालाल यादव यांनी वयाच्या ८१ वर्षीदेखील मेडल पटकवले आहे. नुकत्याच उत्तराखंड येथे झालेल्या ज्येष्ठ नागरिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्यांनी राज्याचे नाव गाजवले आहे. डेहरादून येथील ज्येष्ठ नागरिकांच्या धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी चक्क ३ गोल्ड मेडल मिळवले आहेत. या वयातही माणूस जिद्द असेल तर, काही करू शकतो हे मुन्नालाल यादव यांनी दाखवून दिले आहे.
प्रथम क्रमांक पटकावला :मुन्नालाल यादव यांनी डेहराडून, उत्तराखंड राज्यातील ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत खुल्या गटात नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व केले. दिवंगत महाराणी महिंद्रा कुमारी, माजी खासदार स्मृती ऍथलेटिक्स मीटमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि 5 किमी स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत त्यांनी तीन सुवर्णपदके पटकावली असून दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये दुबईत होणार आहे.