गोंदिया- प्रवासाच्या भरमसाठ खर्चामुळे शैक्षणिक सहलीपासून विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंडळाने शाळांना शैक्षणिक सहलीसाठी प्रवासदरात थेट ५० टक्क्यांची सूट दिली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये शाळांना जीएसटी लागणार नाही. परिवहन महामंडळाच्या या योजनेचा शाळांनी लाभ घेतला असून त्यातून गोंदिया एस.टी आगाराला २३ लाख ६ हजार ८०० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यमातून थोडा विरंगुळा मिळावा व त्यांच्या ज्ञानात भर पडावी या दृष्टीने शाळांकडून शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. प्रवासभाडे वाढल्याने शाळा सहलींवर त्याचा प्रभाव पडतो. परिणामी, विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. असे होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक शाळांना शैक्षणिक सहलींसाठी मोठी भेट दिली आहे. महामंडळाने शाळांना शैक्षणिक सहलींसाठी थेट ५० टक्क्यांची सुट दिली आहे. विशेष म्हणजे, त्यातही शाळांना जीएसटी लागणार नाही. म्हणजेच, खासगी कार्यक्रमांसाठी परिवहन महामंडळाची बस आरक्षित केल्यास ५० रूपये प्रति किलोमिटर व त्यावर जीएसटी आकारले जाते. मात्र, शाळांना २८ रूपये प्रति किलोमिटर व त्यावर जीएसटी लावले जाणार नाही. अर्थात, खासगी कार्यक्रमासाठी लागणाऱ्या दरापेक्षा अर्धा खर्च शाळांना येणार आहे.