गोंदिया - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि विशेष तपास पथक (एसआयटी) या दोन्ही यंत्रणांकडून बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत गोंदियात आयोजित एका पत्रकार परिषदेत खासदार प्रफुल्ल पटेल यांना विचारणा केली असता त्यांनी 'ही नोटीस म्हणजे निव्वळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न' असल्याची प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे दोन दिवसांकरीता गोंदिया-भंडारा दौऱ्यावर होते. त्यानंतर, आज (रविवार) गोंदिया येथे पटेल यांनी पत्रकार परिषद घेत सुरू असलेल्या कामांबद्दल संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, पत्रकारांनी त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा ईडीद्वारे नोटीस पाठविण्यात आली आहे, याबाबत काय सांगणार अशी विचारणा केली. तेव्हा पटेल म्हणाले, 'माझ्या मते नुसतं नोटीस पाठवणं हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे दुसरे काही नाही'.