गोंदिया - "भाजपला वाटते की फक्त त्यांच्याकडेच इनकमिंग सुरु आहे. मात्र, आमच्या पक्षातही भाजपकडून इनकमिंग सुरु आहे", असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला आहे. जिल्ह्यातील तिरोडा भाजपचे माजी खासदार तसेच तिरोडा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे आणि पुत्र भाजप जिल्हा महामंत्री रविकांत (गुड्डू) बोपचे यांनी पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रविकांत यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित बैठकीत पटेल बोलत होते.
रविकांत बोपचे यांनी तिरोडा विधानसभा क्षेत्रासाठी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने उमेदवारी न दिल्याने बोपचे पिता-पुत्राने भाजपला राम- राम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाईंकडून अधिकृत उमेदवारी अर्जही भरला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पटेल यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.