गोंदिया - सध्याच्या घडीला कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतच चालेला आहे. त्यातच कोरोना शिरकाव आता ग्रामीण भागातही सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक गाव-खेडे आहेत त्या ठिकाणी आजही कोरोना संसर्गाबाबत ज्याप्रमाणे माहिती व जनजागृती झाली पाहिजे त्याप्रमाणे झालेली नाही. अशाच ग्रामीण भागातील मुलांना या कोरोनामुळे शाळेत जाणेही बंद झाले आहे. त्यामुळे त्यांचे शिक्षणाकडेही दुर्लक्ष होत चालले आहे. अशा ग्रामीण भागातील लोकांसाठी नागपूर येथील माऊली फाउंडेशन आणि रोटरी क्लब समोर येऊन मदतीचा हात पुढे करत आहे. चला तर बघू ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट…
गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भाग असलेल्या देवरी तालुक्यातील जंगल परिसरात असलेले बोन्डे एओपी (नक्षल विरोधक पथक) अंतर्गत येणाऱ्या बोन्डे या गावातील आदिवासी लोकांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर कसे राहावे याबाबत माहिती दिली. त्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर, साबन तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. तर गावातील शालेय विद्यार्थ्यांना या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने शिक्षणाची लय तुटू नये यासाठी शैक्षणिक साहित्य ही वाटप करण्यात आले.