गोंदिया - कोरोनाच्या काळात जिल्ह्यात कुपोषणाचे (Malnutrition in Gondia) प्रमाण अधिक आहे. जिल्हात कुपोषित 376 बालके आढळून आली असल्याने खळबळ उडाली आहे. त्यापैकी 247 बालकांमध्ये सुधारणा होत आहे. 129 बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण तीव्र आहे. तरीहीसुद्धा फक्त 13 बालकांना पोषाहार पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या केंद्रांबद्दल ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना माहितीच नाही.
ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा शासनाच्या योजना नागरिकांना माहितीच नाही : गोंदिया जिल्ह्याची आदिवासीबहुल जिल्हा अशी ओळख आहे. मात्र, या जिल्ह्यातील दुर्गम भागात आजही आदिवासी बांधव राहत आहेत. मात्र, शासनाच्या मिळणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नसल्याने आजही आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कुपोषित बालके आढळत आहेत. गेल्या दोन दशकांपासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार कुपोषण निर्मूलन करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारचे अभियान आणि उपक्रम राबवत आहेत. तरीसुद्धा बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. सध्या जिल्ह्यात 129 तीव्र कुपोषित बालके असूनही मात्र 13 बालकांवर पोशाहार पुनर्वसन केंद्र गोंदिया येथे उपचार सुरु आहेत, आजही 116 बालके योग्य पोषण आहारापासून वंचित आहेत. जिल्ह्यात फक्त 3 पोषण आहार केंद्र असून, ग्रामीण भागातील पालकांना आजही या आहार केंद्राची माहिती नाही. ही केंद्र गोंदिया आणि तिरोडा येथील शासकीय रुग्णालयात असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी या ठिकाणी जावे कसे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे.
देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे उलटली, तरी कुपोषणाची समस्या न संपता ती वाढतच आहे. ज्या बालकांच्या जोरावर आपण जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहात आहोत, तेच बालकं जर अशक्त असेल, तर आपण जागतिक महासत्ता कसे होणार? त्यामुळे देशातून कुपोषण कायमचे हद्दपार होण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करायला पाहिजेत.
कुपोषित बालकांना १४ दिवसांचा उपचार :गोंदिया येथे बाई गंगाबाई रुग्णालय येथे कुपोषित बालकांसाठी पोषाहार पुनर्वसन केंद आहे, या ठिकाणी कुपोषित बालकांना दाखल केल्यानंतर त्यांची भुकेची तपासणी करून त्यांना एसएफ दिले जाते. नंतर त्या मुलांची वजनानुसार आहार किती दिले पाहिजे हे आहारतज्ञ व डॉक्टर मिळुन ठरवतात. बाळाला भर्ती केलयानंतर सात दिवस कमी कॅलरीचे दुध म्हणजे एफ 75 हे 2-2 तासांनी दिले जाते. बाळ तर संपुर्ण दुध पित असेल तर नंतर त्याला जास्त उर्जा कॅलोरीचे एफ 100 दुध 7 दिवसानंतर 4-4 तासांनी सुरू केले जाते. सोबतच पोष्टीक खिचडी, दलीचा, जेवण हे हळूहळू सुरू केले जाते. हे 14 दिवसांपर्यंत दिले जाते. त्यामध्ये बाळ कुपोषितच्या आजाराने बरे झालेले असते. कुपोषित बालकांच्या आईला ३०० रुपये रोजसह जेवणसुद्धा दिले जाते.
कुपोषित बालकांची घेतली जाते काळजी :बाळाच्या मातांना १४ दिवस प्रशासनाकडून ३०० रुपये रोज दिले जाते. त्याचप्रमाणे बाळाच्या आईला रोज सकाळचा चहा, पोष्टीक नास्ता, संपुर्ण जेवण, मास, हिरव्या भाज्या, पोळी, सलाद दिले जाते. सायंकाळी 5 वाजता बाळाला खिचडीसोबत मातेला चहा, ब्रेड व सायंकाळी 7 वाजता सकाळप्रमाणे संपुर्ण जेवण दिले जातो. त्याचप्रमाणे घरी गेल्यावर परत बाळ कुपोषित होऊ नये म्हणून माताला आहारात घरगुती जेवण व घरच्या घरी पोष्टीक आहार तयार कसा करायचा याचा समुपदेशन व प्रात्यक्षिक करून दाखवतात. जसे गुळ, फल्लीदाना लाडु पोष्टीक पराठा, पोष्टीक खिचडी व या सर्वाबरोबरच आहाराची स्वच्छता, बाळांची काळजी कशी घ्यावी, लसीकरण परसबाग, व्यक्तीक स्वच्छताबद्दल समुपदेशन केले जाते. मात्र, हे सगळे मिळत असल्याचे अनेक ग्रामीण भागात माहिती नसल्याने अनेक ग्रामीण भागातील कुपोषित बालके उपचारापासून दूर करत शासनाद्वारे केलेली जनजागृती कुठे तरी कमी होत असल्याने आजही कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले आहे.