महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परतीच्या पावसाने भात शेतीचे नुकसान; पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी

गोंदिया जिल्ह्यात सध्या कमी-अधिक प्रमाणात पडणाऱ्या परतीच्या पावसाने भात (धान) पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले भात पिक पाण्यात भिजून खराब होत आहे.

परतीच्या पावसाने भात शेतीचे नुकसान
परतीच्या पावसाने भात शेतीचे नुकसान

By

Published : Oct 9, 2020, 10:04 PM IST

गोंदिया- जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. कमी-अधिक प्रमाणात पडणाऱ्या परतीच्या पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले भात पिक पाण्यात भिजून खराब होत आहे. हाताशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

परतीच्या पावसाने भात शेतीचे नुकसान

गोंदिया जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात भात शेती केली जाते. मात्र, या वर्षी जिल्ह्यात भात पिकविणारा शेतकरी हतबल झाला आहे. आधी कोरोनाने त्यानंतर महापूर व नंतर किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कापणी सुरू असताना जिल्ह्याच्या बहुतांश भागात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. भात पिकाला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, कापलेल्या कडपा ओलाचिंब झाल्या आहेत.

यंदाच्या खरीप हंगामात जवळपास १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात आली. यातही हलक्या प्रजातीच्या भाताची लागवड करणाऱ्या शेतक-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

हेही वाचा -मराठा आरक्षण : 'तलवारी हातात घ्यायला लावू नका'

पावसाळ्याच्या सुरुवातीला हुलकावणी देणाऱ्या पावसाने मध्यंतरी समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे बिकट अवस्थेतील भात पिकाला नवजीवन मिळाले. चांगले पीक आल्याने शेतकरी आनंदात होते. मात्र, आठवडाभरापासून कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावत असलेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांच्या आनंदावर विरजण पडले. हलक्या भाताची कापणी करून ठेवलेले कडपांवर पाणी गेल्याने कडपा भिजून त्यातून अंकुर निघण्याची वेळ आली आहे. तर काही कडपा भिजून काळ्याही पडल्या आहेत. या कडपांना वाळविण्याचा आटोकाट प्रयत्न शेतक-यांकडून केला जात आहे.

या आस्मानी संकटाने यावर्षी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून आता तरी मायबाप सरकार शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत करणार का? जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हतबल झाला असून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहमंत्री अनिल देशमुख जिल्ह्यात आल्यावर या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणारा का? असा प्रश्न शेतकरी नेते विचारत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details