गोंदिया -जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम खांबी (पिंपळगाव) येथील यशवंत तानबा रामटेके यांच्या राहत्या घरात बिबट्या दबा धरून बसला होता. बिबट्या घरात ठाम मांडून बसलेला पाहताच प्रसंगावधान राखून सर्व सदस्य घराबाहेर पडले. याबाबत पहाटे साडेतीन वाजता वनविभागाला कळवण्यात आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सव्वा चार तासाच्या शर्तीच्या प्रयत्नांनी अखेर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
घरामध्ये पलंगाखाली दबा धरून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद - गोदिंया न्यूज
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम खांबी (पिंपळगाव) येथील यशवंत तानबा रामटेके यांच्या राहत्या घरात बिबट्या दबा धरून बसला होता. सव्वा चार तासाच्या शर्तीच्या प्रयत्नांनी अखेर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

माहितीनुसार, नेहमीप्रमाणे समोरचा दरवाजा खुला ठेवून रामटेके कुटुंब झोपी गेले होते. तेव्हा मांजरीचा पाठलाग करत बिबट्या मध्यरात्री 2.30 वाजता यशवंत तानबा रामटेके यांच्या घरात घुसला. घरात मांजरची शिकार करताना बिबट्याची हालचाल कुटुंबीयांना दिसून आली. क्षणाचाही विलंब न लावता सर्वजण घराबाहेर निघाले. बाहेरून दरवाजाची कडी लावल्याने बिबट्या घरामध्ये जेरबंद झाला. बिबट्या घरात शिरल्याची माहिती रामटेके यांनी गावचे सरपंच, पोलीस पाटील यांना दिली.
सरपंच प्रकाश शिवणकर, पोलीस पाटील ठाकराम मेश्राम यांनी वनविभाग व पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच संबंधीत अधिकारी खांबी येथे घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बिबट्याला बघण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. बिबट्या घरातील बाजेखाली बसला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरातील सर्व परिसरात जाळे टाकले आणि बाहेरील दरवाजासमोर पिंजरा लावण्यात आला. दरवाजा शेजारी बस्तान मांडून असलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाला सकाळी 7.45 वाजता यश आले. दरम्यान, गावाशेजारी जंगलव्याप्त परिसर आहे. जंगली जनावरांचा नेहमीच या ठिकाणी वावर असणे ही नित्याची बाब झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.