महाराष्ट्र

maharashtra

गोंदियातील क्वारंटाइन सेंटरमधील जेवणात आढळल्या अळ्या, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By

Published : Aug 5, 2020, 7:39 PM IST

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जिनियस रिसॉर्ट येथे क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या निघाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील नागरिकांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांनी थेट नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला फोन करत सर्व प्रकार सांगत कारवाईची मागणी केली.

गोंदिया - जिल्ह्यात बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना शहरातील विविध क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवले जाते. गोंदिया-बालाघाट मार्गावरील जिनियस रिसॉर्ट येथे काही नागरिकांना क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे. याच क्वारंटाइन सेंटरमधील नागरिकांना सकाळी दिलेल्या जेवणात अळ्या आढळल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. त्यामुळे क्वारंटाइन सेंटरमधील नागरिकांचे आरोग्य कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करून ठेवण्यासाठी शहरात ४ ते ५ ठिकाणी स्थानिक नगरपरिषद आणि आरोग्य विभागाने क्वारंटाइन सेंटर स्थापन केले आहे. या क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या नागरिकांच्या जेवण व नाश्त्याची आणि सेंटरच्या स्वच्छतेची जबाबदारी ही नगरपरिषदेची आहे. तर, आरोग्यविषयक तपासणीची जबाबदारी तालुका आरोग्य विभागाकडे आहे. नगरपरिषदेने क्वारंटाइन सेंटरमधील नागरिकांना जेवण आणि नाश्ता देण्यासाठी एका कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. याच कंत्राटदाराच्या माध्यमातून दोन वेळेचे जेवण आणि नाश्ता दिला जातो.

सकाळी ११ वाजता जिनियस रिसार्ट येथील क्वारंटाइन सेंटरमधील नागरिकांना कंत्राटदाराकडून जेवणाचा पुरवठा करण्यात आला. पण काही नागरिकांच्या जेवणात अळ्या आढळल्या तर काहींच्या जेवणात खडे आढळून आले. त्यामुळे या प्रकरणाने येथील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी या प्रकाराची तक्रार क्वारंटाइन सेंटरमध्ये नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्याकडे केली. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांनी थेट नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला फोन करत सर्व प्रकार सांगितला. तसेच, संबंधित कंत्राटदारावार कारवाई करण्याची मागणी केली. तर, अशा या अळ्यायुक्त निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details