गोंदिया- देशात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. नवरात्री उत्सवात अनेक ठिकानी रास गरबा खेळला जातो. काही ठिकाणी वेगवेगळ्या जाती व समाजाकडून रास गरब्याचे कार्यक्रम घेतले जातात. त्या ठिकाणी इतर समाजाच्या लोकांना प्रवेश नाकारला जातो. मात्र, सर्वांना रास गरब्याचा आनंद घेता यावा यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बंजरंग दलातर्फे सिव्हिल लाईन परिसरातील हनुमान मंदिर येथे गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांना प्रवेश असल्यामुळे हे ठिकाण गरबा खेळणाऱ्यांना साद घालत आहे.
जिल्ह्यात मोठ्या उत्सवात दुर्गा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी जिल्ह्यात ४९८ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. तर ५३१ ठिकाणी शारदा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने शहरात २२ ठिकाणी रास गरबा खेळाला जात आहे. मात्र शहर परिसरात अनेक ठिकाणी वेग-वेगळ्या समाजाचे आणि जातीचे गरबे खेळले जात आहेत. यात गुजराती, मारवाडी, सिंधी, पवार अशा अनेक समाजाचे स्वतंत्र गरब्याचे कार्यक्रम होतात. मात्र त्या ठिकाणी इतर जाती व समाजाच्या लोकांना प्रवेश नसतो.