गोंदिया -अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह हे जलाशय तब्बल ६ वर्षानंतर ओरफ्लो झाले आहे. जलाशय भरल्यानंतर जलपूजनाचा मान प्रथम जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्र्यांना असतो. मात्र, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तहसीलदार विनोद मेश्राम यांनी पालकमंत्र्यांच्या जलपूजनाचा नियोजित कार्यक्रम असताना देखील मंगळवारी सकाळी स्वतः जलाशयावर जाऊन जलपूजन केले. त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी पालकमंत्री डॉ. परिणय फुके हे ३ ते ४ च्या दरम्यान या जलाशयाचा जलपूजन करणार असल्याची माहिती होती. तरीही तहसीलदार यांनी जलाशयाच्या कर्मचाऱ्यांना आदेश देत स्वतः जल पुजन केले. मात्र, तहसीलदार यांनी जल पूजन केले असताच पालकमंत्री जलाशयाच्या काही अंतरावर येऊन माघारी परतल्याने याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.