गोंदिया:- राज्य परिचारिका संघटनेने बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोविड प्रार्दुभावात काम केल्याचा जोखीम भत्ता मिळावा, केंद्राप्रमाणे वेतन द्यावे, नवी पदभरती करावी, तसेच कोविड प्रार्दुभावात काम करतांना दगावलेल्या परिचारिकांना शासनाकडून ५० लाखांची मदत मिळावी, या मागण्यांसाठी गोंदियाच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. १०० पेक्षा जास्त परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य अधिपरिचारिका संघटनेकडून २१ व २२ जून रोजी २-२ तासांचे सांकेतिक आंदोलन करण्यात आले. तसेच बुधवारपासून संपूर्ण वेळ बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे.
या आहेत मागण्या
यामध्ये १०० टक्के पदभरती, १०० टक्के प्रमोशन, राज्यात केंद्र शासनाच्या धर्तीवर नर्सिंग भत्ता देणे, कोविड काळात ७ दिवसांचा कर्तव्य काळ व ३ दिवसांची अतिरिक्त सुट्टी देणे, केंद्र सरकार प्रमाणे पद नावात बदल करणे, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर नियमबाह्य निलंबन व कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे व इतर मागण्याचा समावेश आहे.