गोंदिया - पूर्व विदर्भातील हिंदू-मुस्लीम बाधवांचे एकात्मतेचे तीर्थक्षेक्षत्र म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 'प्रतापगडची यात्रा' प्रसिद्ध आहे. प्रतापगड येथे मोठा महादेव तर त्यालाच लागून उंच पहाडावर मुस्लीम बांधवांचे 'ख्वाजा उस्मान गणी हारूनी' यांचा दर्गा आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी लाखो हिंदू-मुस्लीम बांधव एकच गर्दी करीत असून प्राचीन इतिहासातही याची नोंद आहे
आज संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सर्वत्र विविध यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, हर हर महादेवचा गजर करत भाविकही मोठ्या संख्येने यात्रेत उपस्थित होत आहेत. अशाच प्रकारची वैशिष्टपूर्ण यात्रा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे भरत असते. लाखो हिंदू व मुस्लीम भाविक जिल्हाभरासह इतर राज्यातून या यात्रेला हजेरी लावत असतात. महादेवाच्या मंदिरासोबतच या ठिकाणी सुमारे ३०० वर्षांआधी होऊन गेलेले ख्वाजा उस्मान गणी हारूनी यांच्या दर्ग्यावर नतमस्तक होऊन मागणं मागत असतात. महाशिवरात्रीच्या पर्वावर हिंदू व मुस्लीम बांधव एकत्रित येऊन हा सन साजरा करत असल्यामुळे या ठिकाणचे महत्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
या ठिकाणी सुमारे ३०० वर्षापूर्वी गोंड राजाचे शासन होते व त्या काळातच या ठिकाणी येथील डोंगर फोडून प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला होता. काही कालावधीनंतर गोंड राजांच्या या या किल्ल्यावर राजे रघुजी भोसले यांनी आक्रमण करून प्रतापगडवर विजय मिळविला. यानंतर किल्ल्याचा कारभार सांभाळ करण्याची जबाबदारी राजा खान यांच्याकडे देण्यात आली. दरम्यानच या ठिकाणी ख्वाजा उस्मान गणी हारूनी यांचे वास्तव्य होते. ते अनंतात विलीन झाल्यानंतर मोठा महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडाच्या दुसऱ्या बाजूला त्यांचा दर्गा स्थापन करण्यात आला. तेव्हापासूनच या ठिकाणी गेल्या ३०० वर्षापासून यात्रा भरीत असल्याचे गावकरी सांगतात. उंच पहाडावर गोंड राजांनी बनविलेला प्रतापगड किल्ला आजही दिमाखात ऊभा असून त्या ठिकाणी भगवान शिव यांची दगडाची मूर्ती तसेच शिवलिंग आजही आहे. जंगलांनी वेढलेल्या या किल्ल्यात प्राचीन विहीरी, गुफा आजही आपणास पाहायला मिळत असून दूरवरुन भक्तगण या ८ दिवस चालणाऱ्या यात्रेला भेट देतात.