गोंदिया- कोरोना गावात पसरु नये म्हणून गोरेगाव नगरपंचायतीने बाहेर गावातून आलेल्यांनी घरी बसून माहिती द्यावी, यासाठी एक वेब लिंक तयार केली आहे. यावर 30 हून अधिक लोकांनी घरी बसून माहिती दिली. यावरून त्यांची घरबसल्या आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
देशात सध्या कोरोनाने थैमान घातला असून 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करत लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. तसेच विदेशातून देशात व एका गावाहून दुसऱ्या गावी परतणाऱ्यांना आरोग्य तपासणी करा, अशी विनंतीही केली होती. यावरून गोरेगाव नगर पंचायतीचे नागराध्यक्ष आशिष बारेवार यांनी नागरिकांना घराबाहेर न पडता माहिती देता यावी यासाठी लिंक तयार केली. या लिंकमध्ये नागरिकांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कोठून आला, कधी आला, आजारासंबंधी माहिती, होम क्वारंटाईनच्या शिक्क्याबद्दल माहिती भरता येत आहेत.