गोंदिया : छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर गोंदिया जिल्ह्यात नैसर्गिक निर्मित कचारगड गुफा आहे. ही आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा म्हणून ओळखली जाते. मात्र, पर्यटन व पुरातन विभागाचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे ही गुफा आज विकासापासून कोसो दूर आहे. शासनाने याकडे लक्ष दिले तर जिल्ह्यतीलच नव्हे, तर विदर्भातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आणि तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाऊ शकते.
प्रमिला शेंद्रामे, अध्यक्षा नेशनल आदिवासी महिला फेडरेशन माहिती अभावी पर्यटक गुफेपासून दूर -
गोंदिया जिल्हा नैसर्गिक संपदेने नटलेला आहे. गोंदिया जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचे पूर्वद्वार म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात कचारगड गुफा, नागझिरा अभयारण्य, प्रतबंगड, बोदलकास, नागरा धाम, हाजराफाल ही मोठी पर्यटन व तीर्थस्थळे आहेत. प्रत्येकवर्षी या तीर्थ स्थळावर यात्रा भरते. हजारोंच्या संख्येत व्याघ्र दर्शनासाठी पर्यटक नागझिरा अभयारण्यात येतात. पर्यटकांना आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कचारगड या तीर्थ स्थळाची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे पर्यटक या गुफेच्या दर्शनापासून वंचित राहतात. कचारगड गुफा संदर्भात माहिती घेण्यात आली असता याविषयी अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत.
गुफेला नैसर्गित सौंदर्य -
कचारगड गुफा प्राचीन काळापासून नैसर्गिक निर्मित आहे. या गुफेतून आदिवासी गोंडीयन धर्माचे संस्थापक पारी कुपार लिंगो यांनी धर्मप्रचार सुरु केला होता. तेव्हापासून या गुफेला आदिवासींचे उगम स्थान संबोधले जाते. अतिशय घनदाट जंगलात ही गुफा आहे. त्यामुळे या गुफेला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. या परिसरात विविध गंभीर आजारांवर उपयोगात येणारी वनऔषधी झाडे पाहायला मिळतात.
कचारड गुफा विकसीत करा- स्थानिक 16 राज्यातील लाखो आदिवासी येतात यात्रेला -
तसेच या गुफेत एक मोठी निसर्गनिर्मित विहीरसुद्धा आहे. या विहिरीतील पाणी १०० टक्के शुद्ध असल्याचे बोलले जाते. या गुफेच्या काही अंतरावरच आणखी एक नैसर्गिक मोठी गुफा आहे. या गुफेत प्रवेश करण्यासाठी कमीत कमी ४ ते ५ किलोमीटर अंतर पायी डोंगरावर चढावे लागते. प्रत्येकवर्षी या कचारगड यात्रेला १६ राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने हजार राहतात. मात्र, येथे सुविधांचा अभाव असल्यामुळे पर्यटकांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून येते. जर शासनाने पर्यटक व तीर्थस्थळाकरिता आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या, तर जिल्ह्यातीलच नाही तर विदर्भातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र व तीर्थस्थळ म्हणून हे स्थान ओळखले जाऊ शकते.
पर्यटकांच्या वाढीसाठी या सुविधांची गरज -
कचारगड गुफेच्या दर्शनासाठी पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यटकांचा येथे येण्याचा ओघ निश्चितच वाढू शकतो. त्यासाठी कम्युनिटी हॉल, म्यूझियम, शौचालय, ग्रंथालय, गोटुल शिक्षा केंद्र (आदिवसी बोलीभाषा प्रशिक्षण केंद्र), विश्राम गृह, गार्डन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, ब्रिज कम बंधारा (खाली बंधारा व वर पूल) प्ले ग्राउंड, हॉटेल, रस्ते इत्यादी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, शासनाचे व पुरातत्व विभागाचे याकडे गंभीरपणे लक्ष नाही. त्यामुळे सुविधांचा अभाव आहे. तरी शासनाने या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पारिकुपार लिंगो माँ काली कंकाली देवस्थान कचारगड धनेगाव यांनी केली आहे.