गोंदिया -जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. कोरोना रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी व कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यासाठी आरोग्य विभागाने कोविड-१९ च्या सेवेत फक्त १६ रुग्णवाहिका पुरवल्या आहेत. यापैकी ७ रुग्णवाहिका या खासगी आहेत. यामुळे कोविड-१९ च्या रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसून त्यांना तासन्-तास रुग्णवाहिकेची वाट बघावी लागत आहे.
गोंदियात आतापर्यंत एकूण ३ हजार ५५५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील १ हजार ८८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या १ हजार ६१९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. जिल्ह्यात अशी परिस्थिती असताना आरोग्य विभागाकडे सेवा देण्यासाठी पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाच्या, १०८ क्रमांकाच्या १५ रुग्णवाहिका आणि १०२ क्रमांकाच्या ५८ रुग्णवाहिका सेवा देत आहे. १०८ क्रमांकाच्या १५ रुग्णवाहिकांमधून ८ , १०२ क्रमांकाच्या ५८ पैकी १ तर खासगी ७ अशा एकूण १६ रुग्णवाहिका कोविड-१९ च्या सेवेसाठी उपलब्ध आहेत.