गोंदिया - राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच जिल्ह्यातील जनतेला कोरोनाचा धोका अधिक निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचेही जिल्ह्याकडे दुर्लक्ष आहे का? असा प्रश्न सध्या विचारला जातोय. कोरोना विषाणूचे होत असलेल्या संक्रमणाच्या काळात गोंदियाचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख हे दुसऱ्यांदा जिल्ह्यात आले होते. परंतु, पालकमंत्र्यांनी लपून छपून बैठक घेतली असे म्हणावे इतकी गुप्तता पाळली गेली होती, असा आरोप स्थानिक प्रतिनिधी आणि स्थानिक प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी केला आहे.
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुखांनी घेतलेल्या कोराना आढावा बैठकीची आम्हाला कल्पनाच नव्हती; स्थानिक प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींनीचा आरोप हेही वाचा...क्रुरतेचा कळस..! गर्भवती हत्तीणीला पेटती स्फोटके खायला देऊन हत्या, केरळमधील घटना
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (बुधवार) जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. मात्र, या बैठकीला राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, स्थानिक आमदार आणि स्थानिर वृत्त प्रतिनिधी यांना आमंत्रण दिले नव्हते, असा आरोप केला जात आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अनिल देशमुख दुसऱ्यांदा जिल्ह्यात आले होते. याआधी २६ एप्रिल रोजी पालकमंत्री जिल्ह्यात आले होते. त्यावेळी गोंदिया जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण होता. जो उपचारानंदर बरा होऊन घरी परतला. मात्र, सध्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्यात २५ च्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील प्रसार माध्यमांसोबत संवाद न साधने, हे प्रसार माध्यमांवर बहिष्कार टाकण्यासारखे असल्याचे एका स्थानिक वृत्त प्रतिनिधीने म्हटले आहे.
राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांना आणि गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार, यांनाही सदर आढावा बैठकीची माहिती देण्यात आली नाही. यावरून पालकमंत्र्यांनी ही बैठक लोकप्रतिनिधी आणि इतर प्रतिनिधींना विश्वासात न घेता केली असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधी करत आहेत.