गोंदिया- जिल्ह्यात उद्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची ( Local Body Elections Gondia ) तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली ( Gondia District Administration ) आहे. निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रावर आज (सोमवारी) पाठविण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग समजल्या जाणाऱ्या सालेकसा, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी आणि देवरी या चार तालुक्यात मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. तर गोंदिया, आमगाव, तिरोडा आणि गोरेगाव या चार तालुक्यात सकाळी ७.३० ते ५ वाजेपर्यंत वेळ रहाणार आहे.
८ लाख ३८ हजार ९७७ मतदार बजावणार आपला हक्क
उद्या ( मंगळवारी ) होणाऱ्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी, ८ पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी आणि ३ नगर पंचायतीच्या ४५ जागांसाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी ८ लाख ३८ हजार ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी १ हजार ३७५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
तालुक्यानुसार मतदान केंद्र
जिल्ह्यात १ हजार ३७५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३८०, गोरेगाव १४६, सालेकसा १३६, देवरी १२६, तिरोडा १९५, आमगाव ११९, सडक-अर्जुनी १३१ अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १६५ केंद्रांचा समावेश आहे.