गोंदिया - चार्जिंगसाठी ठेवलेले मोबाइल चोरी करणार्या टोळीतील तीन महिलांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे. गोंदियाच्या रहिवासी मोहसीन सेफी शेख (32 वर्ष रा. मामा चौक) यांच्या राहत्या घरातून चोरट्याने 10 हजार व 7 हजार रुपये किंमतीचे मोबाइल चोरी केले होते.
या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू होता. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी रेल्वे स्थानकाजवळील खुल्या जागेवर संशयास्पद स्थितीत बसलेल्या महिलांची चौकशी केली. त्या महिलांकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिला छत्तीसगडच्या डोंगरगड येथील रहिवासी आहेत. या महीलांवर मोबाइल चोरीचे चार गुन्हे गोंदिया शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
पोलीस निरीक्षक महेश बंसोडे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विजय राणे व पोलीस कर्मचार्यांनी रेल्वे स्थानक परिसरात आरोपींनी खड्डे खोदून लपविलेले 25 मोबाइल जप्त केले. जप्त केलेल्या मोबाइलची किंमत 2.32 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. महिलांना अटक केल्यावर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.