गोंदिया - नगर पालिकेचा कारभारा विषयी चर्चा केली तरी ती कमीच ठरणार. शहर स्वच्छतेपासुन इतर समस्या प्रलंबित असताना पालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्याही आ-वासुन उभ्या आहेत. अशातच दिवाळी सारखा महत्वाचा सन अंधारात गेल्यानंतर पालिकेतील सफाई कामगारांनी मागील काही दिवसांपासुन कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे पालिका क्षेत्रातील स्वछतेचा बोझवारा उडाला आहे.
गोंदिया नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन जानेवारी ते सप्टेंबर २०१९ पर्यंतचे सहायक अनुदान सर्व नगर परिषदांना वितरीत करण्यात आले. वितरीत करण्यात आलेल्या अनुदानामध्ये नगर परिषद गोंदियाला २ कोटी २० लाख ७७ हजार ६२५ रुपये प्रति महिना अनुदान मिळत असे. मात्र, जानेवारी ते सप्टेंबर २०१९ पर्यंत या १० महिन्याच्या कालावधीत ९ कोटी २७ लाख ६० हजार रूपये एवढे अनुदान कमी मिळाल्याने नगर परिषदे मधील कार्यरत कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासंदर्भात अडचण निर्माण होत आहे.
येथे कर्मचारी संख्या जास्त असल्याने नगर परिषद निधीतून वेतन देणे शक्य होत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढत असून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. नगर परिषद गोंदियाला प्रत्येक महिन्याकाठी २ कोटी २० लाख ७७ हजार रुपये अनुदान मिळत असते. त्यानुसार जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत आवश्यक असलेले अनुदान २५ कोटी ५ लाख १६ हजार २९२ रुपये एवढी त्यापैकी त्यापैकी नगर परिषदेला १६ कोटी ७७ लाख ५६ हजार १६९ रुपये प्राप्त झाले आहे. त्यानुसार आतापर्यंत ९ कोटी २७ लाख ६० हजार १२३ रुपये एवढे अनुदान कमी मिळाले असल्याने उपरोक्त बाकी असलेल्या अनुदानामुळे कार्यरत कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचे वेतन देण्यास अडचण निर्माण होत आहे.
नगर परिषद गोंदिया येथे कायम कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. परिणामी नगर परिषद निधीमधून वेतन देणे शक्य होत नाही. सद्यस्थितीत नगर परिषद गोंदियाचे कर्मचाऱ्यांचे वेतन सहायक अनुदानाअभावी एक महिना उशिरा दिले जात आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढत असून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे.