गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथील प्रतापगड देवस्थान प्राचीन तिर्थक्षेत्र तसेच हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिध्द आहे. मात्र, याच ठिकाणची भगवान शंकराची मूर्ती जळाल्याची धक्कादायक घटना आज २६ जुलै ला घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय हा घातपाताचा प्रकार आहे की निसर्गाचा कोप? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून वीज पडल्याचे कारण सांगण्यात येत आहे.
हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान प्रतापगडावरील भगवान शंकराची मूर्ती जळाली; घातपात की निसर्गाचा कोप? चर्चांना उधाण प्रतापगडला ऐतिहासिक, पौराणिक धार्मिक वारसा लाभलेला आहे. येथील प्रतापगड डोंगरावर गोंडकालीन किल्ल्याचे अस्तित्व आहे. या गडावरील प्राचीन शिव मंदिर हे पंचक्रोषीतील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. तसेच गडासमोर हाजी उस्मान गणी यांचा दरगाह आहे. त्यामुळे या दोन्ही श्रद्धास्थानावर हिंदू-मुस्लिम भक्तीभावाने एकत्र येतात. त्यामुळे हे स्थळ सामाजिक एकतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाते.
प्रताप गडावर दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते. गोंदिया जिल्ह्यासह शेजारी छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातील भाविक देखील मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यासाठी गेल्या २००३ मध्ये तत्कालीन आमदार नाना पटोले यांनी गडावर विशाल अशी २० फूट उंचीची भगवान शंकराची मूर्ती स्थापन केली. येथे येणाऱ्या भाविकांसाठी ही मूर्ती विशेष आकर्षण ठरत होती. महाशिवरात्रीला लाखो भक्त भोलेनाथाच्या दर्शनाला येतात. त्यामुळे या क्षेत्रातील विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांनी अनेक विकास कामे केली, तसेच शिवभक्तांना सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला. त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.
प्रतापगडावरील भगवान शंकराची मूर्ती जळाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मूर्ती जळाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरताच अनेक शिवभक्तांनी गडाकडे धाव घेतली. अर्धवट जळालेली मूर्ती पाहून घातपाताचा प्रकार आहे की, निसर्गाचा कोप? अशा चर्चा सुरू झाल्या. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार बडोले घटनास्थळी पोहोचले. योग्य चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच या घटनेची माहिती देखील मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगितले. शिवाय जनतेला शांतता पाळण्याचे आवाहन देखील आमदार बडोले यांनी केले.