गोंदिया- पावसाने दांडी मारल्यामुळे जिल्ह्यात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी परे सुकली आहेत. म्हणून शासनाने क्षणाचाही विलंब न लावता धान उत्पादक शेतक-यांना प्रति एकरी २५०० रूपये नुकसानभरपाई द्यावी अन्यथा तीवर आंदोलन करत रस्त्यावर उतरू, अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.
जिल्हा दुष्काळग्रस्त करून शेतक-यांना हेक्टरी २५ हजाराची मदत करा - नाना पटोले गेल्या १५ दिवसांपासून पूर्व विदर्भात पावसाने दांडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट बनली आहे. धानाचे कोठार म्हणून संबोधण्यात येणाऱ्या जिल्ह्यात पाण्याअभावी धान्याचे पीक करपायला लागले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस बरसला नाही तर या ठिकाणी स्थिती अजूनच बिकट होणार आहे.
पटोले यांनी राज्य सरकारवर आरोप करत म्हटले आहे की, राज्यातील भाजप-सेना सरकारतर्फे शेतकऱयांसाठी सुरू करण्यात आलेली कर्जमाफी योजना फसवी ठरल्याने शासनाने संपुर्ण कर्जमाफी घोषणा करावी. राज्यातील फडणवीस व केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱयांच्या हिताला मुठमाती देण्याचे काम सरकार करीत असुन मागील ५ वर्षात शेतकऱयांच्या हिताचे घेतलेल्या निर्णय त्यांनी जाहीर करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत ईव्हीएम मशीन सेट करून भाजपचे खासदार निवडून आले आहेत. आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरने व्हाव्यात, यासाठी ९ ऑगस्ट पासून संपुर्ण देशात 'ईव्हीएम हटाव, लोकतंत्र बचाव' ही मोहिम काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.