गोंदिया- कोरोनाच्या महामारीने अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामध्ये शेतकरी कुटुंबांचाही समावेश आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले असताना कित्येक शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुषच कोरोना विषाणूचा बळी ठरला आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. मात्र कोरोनाने पिचलेल्या अनेक शेतकरी कुटुंबांकडे स्वत:ची जमीन कसायलाही पैसा उरला नाही. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीची भीषणता लक्षात घेत भीमसेन अॅग्रो पार्कने मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
भीमसेन अॅग्रोने जपली सामाजिक बांधिलकी कोरोनाच्या महामारीत ज्या शेतकरी कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबीयांना या खरीप हंगामासाठी भीमसेन अॅग्रोच्या वतीने जमिनीची मोफत मशागत करुन दिली जात आहे. त्यांच्या या उपक्रमाने शेतकऱ्यांना हा खरीप हंगाम पिकवून पुढील उदनिर्वाह करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
कोरोनामुळे बळी गेलेल्या शेतकऱ्याच्या शेतीची मोफत मशागत कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यामध्ये शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात पिकवलेला शेतीमाल खराब होऊन गेला. त्यातच कोरोना विषाणूने शेतकऱ्यांच्या कुटुंबातही शिरकाव केला. या महामारीत अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये शेती करणारा कर्ता पुरुषच कोरोनाला बळी गेल्याच्याही घटना गोंदिया जिल्ह्यात घडल्या आहेत.
ज्या शेतकऱ्याचे कुटुंब केवळ शेतीवरच अवलंबून आहे, अशा कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आर्थिक अडचणीत मोठ्या प्रमाणात भर पडली गेली. त्यातच खरीप हंगाम सुरू झाला. मात्र, शेतीची मशागत आणि पेरणी केल्याशिवाय शेती पिकणार कशी? त्यातच कोरोनामुळे कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालेले शेतकरी कुटुंबाच्या हातात दमडीही शिल्लक राहिली नाही. याच परिस्थितीची जाण ठेवत गोंदिया येथील भीम अॅग्रो पार्कने कोरोनाबाधित मृत शेतकऱ्याच्या जमिनीची मोफत मशागत करून देण्याचा उपक्रम हाती घेतला. यामध्ये शेतात नांगरणी आणि चिराटा करून दिला जात आहे.
७० एकर जमिनीची मशागत-
गोंदियातील भीम सेन अॅग्रो पार्कचे संचालक मयूर गजभिये आणि धनंजय वैद्य यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. भीमसेन अॅग्रो पार्क च्या १५ किलो मीटर परिसरात ज्या शेतकऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा पीडित शेतकरी कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांच्या शेतात धान पिकाच्या लागवडी करिता, मोफत नांगरनी तसेच वखरणी करून देत आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे कोरोनाबाधित शेतकरी कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पर्यंत भीमसेन अॅग्रोच्या वतीने सुमारे ७० एकर शेतीची मशागत करून देण्यात आली आहे. तसेच गजभिये यांच्या या सामाजिक बांधिलकी प्रमाणे इतरांनीही पुढे येऊन बळीराजाला मदत करावी, असे आवाहन पीडित शेतकरी आणि भीमसेन अॅग्रोकडून करण्यात येत आहे.