गोंदिया- बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा या गावात घडली असून डिलेश्वर श्रावण मेश्राम असे त्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान डिलेश्वरचा खून करून मारेकऱ्यांनी मृतदेह विहिरीत फेकल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. गावात मात्र ही आत्महत्या की घातपात याबाबत उलट-सुलट चर्चांना पेव फुटले आहे.
धक्कादायक; विहिरीत आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह, वडील म्हणाले. . . .
आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा या गावातील डिलेश्वर श्रावण मेश्राम हा गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता होता. मात्र त्याचा मृतदेह गावाशेजारील विहिरीत आढळून आला. ही आत्महत्या की घातपात याबाबत गावात उलट-सुलट चर्चांना पेव फुटले आहे.
मृतक डिलेश्वर मेश्राम हा पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. १४ मेच्या रात्री तो अचानक गायब झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. शेवटी निराश होऊन नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी, १५ मे रोजी आमगाव पोलीस ठाणे गाठून डिलेश्वर बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.
शनिवारी गावाजवळील विहिरीत प्रेत पाण्यावर तरंगताना आढळले. ज्या विहिरीत प्रेत आढळले, त्या विहिरीचे नवीन बांधकाम सुरू असून ती विहीर फक्त १० ते १२ फूट खोल आहे. विहिरीत ६ फूट पाणी आहे. प्रेत विहिरीत आढळल्याची बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनी विहिरीजवळ गर्दी केली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. मृतदेह आमगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. डिलेश्वरचा मृतदेह विहिरीत आढळल्याने गावात उलट-सुलट चर्चा ही सुरू असून ही हत्या की आत्महत्या हे तपासानंतरच समोर येईल. पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप उरकुडे हे तपास करत आहेत.