महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यातील जंगलात गारपिटीने तब्बल ५ हजाराहून अधिक पोपटांचा मृत्यू - गोंदिया जिल्ह्यात गारपिटीने तब्बल ५ हजाराहून अधिक पोपटांचा मृत्यू

आज सकाळी गावातील गुराख्यांना जंगलात असंख्य पोपट मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले दिसले. त्यांनी याची माहिती गोरेगाव येथील निसर्ग मंडळाच्या सदस्यांना आणि वन विभागाला दिली. दोन्ही चमूने आज दिवसभर जंगलात बचावकार्य राबवत जखमी पोपटांना उपचारांसाठी पाठविले. तर, मृत पोपटांना खड्डा करून जमिनीत पुरण्यात आले.

जिल्ह्यातील जंगलात गारपिटीने तब्बल ५ हजाराहून अधिक पोपटांचा मृत्यू
जिल्ह्यातील जंगलात गारपिटीने तब्बल ५ हजाराहून अधिक पोपटांचा मृत्यू

By

Published : Mar 14, 2020, 11:18 PM IST

Updated : Mar 14, 2020, 11:49 PM IST

गोंदिया -जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जोरदार वादळासह झालेल्या गारपिटीने शेतपिकाची धूळधाण केली आहे. तर, दुसरीकडे गोरेगाव तालुक्यातील कटंगी धरणाजवळ ५ हजाराच्या वर पोपटांचा मृत्यू झाला आहे. तसेच, इतरही शेकडो पक्षीही जखमी झाले आहे. वन विभागाने त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. जखमी पोपटांनाही प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले.

जिल्ह्यातील जंगलात गारपिटीने तब्बल ५ हजाराहून अधिक पोपटांचा मृत्यू

कंटगी धरणाजवळ वनविभागाच्या सागवान नर्सरी परिसरात गुरुवारी आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वादळी पाऊस आणि गारपीट झाली. याचा तडाखा नर्सरी परिसरात वास्तव्यास असलेल्या पोपटांना बसला. गारपिटीमुळे ५ हजारच्या वर पोपटांचा मृत्यू झाला. नर्सरी परिसरात मृत पोपटांचा अक्षरक्ष: सडा पडला होता. सदर धरण परिसरात 50 एकरामध्ये वनविभागाचे सागाचे जंगल असून येथे लाखोंच्या संख्येने पोपटांचे वास्तव्य आहे.

आज सकाळी गावातील गुराखी जंगलात गुरे चारण्यासाठी गेले असताना त्यांना असंख्य पोपट मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले दिसले. त्यांनी याची माहिती गोरेगाव येथील निसर्ग मंडळाच्या सदस्यांना आणि वन विभागाला दिली. दोन्ही चमूने आज दिवसभर जंगलात बचावकार्य राबवत जखमी पोपटांना उपचारांसाठी पाठविले. तर, मृत पोपटांना खड्डा करून जमिनीत पुरण्यात आले.

संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या भीतीने हादरला असताना गावाशेजारील जंगलात ५ हजारच्या वर पोपट मेल्याने दुर्गंधी सुटली आहे. यामुळे रोगराई पसरेल की काय, अशी नवी भीती ग्रमस्थामध्ये आहे. वन विभागाने आठ दिवस जंगलात गुरे चरायला नेण्यास मज्जाव केला आहे.

दरम्यान, वादळाची तीव्रता अधिक असल्याने शेतातील उभे पीक भुईसपाट झाले. गारांमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने गहू व चणा हा माल जागीच फुटून जमीनदोस्त झाला आहे. गारांचा आकार मोठ्या लिंबाएवढा असल्याने लोकांच्या घरांवरील पत्रे, मोटारींच्या काचा व पक्ष्यांना त्याचा मोठा फटका बसला. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे अतिवृष्टी झाली. येथे ८९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या परिसरातील टरबूज, भेंडी, चवळी, मका, कारली या भाज्या जमीनदोस्त झाल्या आहेत. विजेचे खांब कोसळून विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. अनेक घराचे छतेही उडाली आहेत. या सर्व नुकसानाची भरपाई शासन देईल काय, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - सावधान..! कोरोनाबाबत माहिती देणारी 'ही' लिंक उघडू नका

हेही वाचा - राज्यात 'या'ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिला गुन्हा दाखल

Last Updated : Mar 14, 2020, 11:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details