गोंदिया - जिल्ह्याच्या नागझिरा व पिटेझरी या NNTR च्या दोन वनपरिक्षेत्रामध्ये अज्ञातांनी लावलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या तीन वन मजूरांचा होरपळून मृत्यू झाला असून दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. गुरूवारी सकाळी ११.३०च्या सुमारास नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वन परिक्षेत्रात कक्ष क्रमांक ९७, ९८,९९,१०० येथे आग लागल्याचे दिसून आले. जवळपास ५० ते ६० वन कर्मचारी, अधिकारी आणि हंगामी मजूर आग विझवण्याचे काम करत होते. सायंकाळी ५च्या सुमारास ही आग आटोक्यात आली. मात्र, वाऱ्याने पुन्हा अंगार पेटली आणि अचानक आगीने वेढल्याने वणवा विझवणाऱ्या तीन हंगामी वन मजूरांचा मृत्यू झाला.
नागझिरा आणि पिटेझरीच्या NNTRच्या दोन वनपरिक्षेत्राला लागली आग, आग विझवणाऱ्या तीन वन मजूरांचा मृत्यू - गोंदिया पोलीस बातमी
नागझिरा आणि पिटेझरीच्या NNTRच्या दोन वनपरीक्षेत्राला आग लागली. ही आग विझवणाऱ्या तीन वन मजूरांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मृत्यू झालेल्या वन मजूरांमध्ये राकेश युवराज मडावी (वय ४०, राहणार थाडेझरी) रेखचंद गोपीचंद राणे (वय ४५ राहणार धानोरी) सचिन अशोक श्रीरंगे (वय २७, राहणार कोसमतोंडी) या हंगामी वनमजूरांचा समावेश आहे. तर विजय तीजाब मरस्कोले (वय ४०, रा- थाडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) राजू शामराव सयाम (वय ३०,रा. बोरुंदा, जिल्हा गोंदिया) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन वनपरिक्षेत्रात गुरूवारी अज्ञात व्यक्तीने लावलेली आग विझवताना तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला. दोन वनमजूर जखमी झाले आहेत. अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मृत मजूरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आगीत जखमी झालेल्या वनमजूरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मृत कुटुंबियांना २५ लक्ष रुपयाची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.