गोंदिया- अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून मागील आठ महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी, नगर अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले.
अग्निशमन विभागात एका एजन्सीमार्फत कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यांपासून कंत्राटदाराने पगार दिलेला नाही. परिणामी कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे कर्मचारी कंत्राटदाराला पगार मागत असल्यास तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. नगर परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.