गोंदिया -जन्मदात्या वडीलाने आपल्या चिमुकल्या मुलीचा खून करणे, ही कल्पनासुद्धा अंगावर काटे उभे करते. मात्र, अशीच काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम लोणारा येथे 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली. मुलीला खाऊ खाण्यासाठी 5 रुपये न दिल्याने ती चिमुकली जोर जोरात रडू लागली होती. त्यामुळे रागात येऊन मुलीला मार, असे म्हणून तिला उचलून जोराने दारावर आपटून जन्मदात्यानेच तिचा खून केला. विवेक विश्वनाथ उइके (28) रा. लोणारा, असे आरोपी पित्याचे नाव असून वैष्णवी विवेक उइके (1 वर्ष 8 महीने) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणात मृत मुलीची आई वर्षा विवेक उइके (22) यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात 3 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली आहे.
अशी घडली घटना -
2 फेब्रुवारी रोजी विवेक सकाळी 8 वाजता ग्राम कोडेलोहारा येथे एका लग्नाला गेला होता. कार्यक्रम आटोपून सायंकाळी 6.30 वाजता तो घरी परतला. सायंकाळी 7 वाजता मुलीला खाऊ घेऊन देण्यासाठी वर्षाने पती विवेकला 5 रुपये मागितले. तेव्हा पतीने पैसे दिले नाही. त्यानंतर मुलगी जोर जोरात रडू लागली. त्यामुळे पती विवेकने मुलगी वैष्णवीला पत्नी वर्षाकडून आपल्याकडे घेतले व विनाकारण रडते म्हणून मुलीला जोर जोरात दारावर आपटले. वर्षाने पतीला अडविण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिलासुद्धा ढकला ढकल करत बाजूला केले. त्यानंतर ती बेशुद्ध पडून होती. तिला वर्षाने उचलून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पती विवेकने पुन्हा पत्नी वर्षाला दोन कानशिलात लगावल्या. तसेच विवेक व त्याच्या आईने मुलीला दवाखान्यात नेतो म्हणून निघून गेले. काही वेळाने मुलीला घेऊन परत आल्यावर मुलगी मरण पावली, असे सांगितले.
विवेकला पोलिसांनी केली अटक -