गोंदिया - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका महिलेची गोंदियातील खासगी रुग्णालयात प्रसूती करण्यात आली. यावेळी आईचे रक्तगट निगेटीव्ह असल्याने बाळाला कावीळ आणि अॅनिमिया झाला. मात्र, डॉक्टरांनी बाळाच्या जन्मानंतरच्या ३ तासांमध्ये तीनदा रक्त बदलाची प्रक्रिया करून त्याचा जीव वाचवला. या प्रक्रियेला 'एक्सचेंज ट्रान्सफ्यूजन' असे म्हणत असून जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातील किशोरी गावातील अर्चना दिपक गजभिये यांना प्रसूतीसाठी गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूती झाल्यानंतर बाळाच्या आईचे रक्तगट निगेटिव्ह असल्यामुळे बाळाला गर्भाशयातच कावीळ झाला होता. त्याच्या शरीरातील रक्ताचे प्रमाणही कमी असल्यामुळे कावीळ आजार वाढून त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्याचे रक्त बदलणे गरजेचे होते. यासाठी बाळाच्या जन्मानंतर अवघ्या ३ तासांच्या आत बाळाचे रक्त बदलण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे अवघ्या ३ तासांमध्ये बाळाचे रक्त तीन वेळा बदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून सुखरूप असल्याने त्याला शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टीही देण्यात आली. हे प्रकरण अत्यंत शिताफीने डॉ. सुनील देशमुख यांनी हाताळले. हा प्रयोग गोंदिया जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.