गोंदिया -परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांचे घर, वाहने, पिकाचे फार नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री अतिवृष्टी झालेल्या गोरेगाव तालुक्यातील जनावरांच्या निवाऱ्याचेही नुकसान झाले आहे. तसेच गोंदिया रुग्णालयाच्या परिसरातील चार चाकी वाहनावर झाड कोसळल्याने गाडीचे नुकसान झाले. मात्र, जीवितहानी झाली नाही. नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - रस्त्याअभावी नागरिकांचे हाल, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा करवाडीच्या ग्रामस्थांचा इशारा
गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी, गोरेगाव मंडळ येथे जोरदार पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. भाताचे पीक अक्षरश: जमिनीवर लोळले आहे. पिंडकेपार येथील रमेश चौधरी यांचे घर मध्यरात्री कोसळल्याने दुचाकी, सायकल, भांडे व अत्यावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. यात पीडित कुटुंबाने सुमारे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. तलाठ्याने नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी कुटुंबाने केली आहे.