गोंदिया-जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत असून दररोज १०० च्या वर कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी प्रशासनाने गेल्या १० दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात (केटीएस) येथे १०० खाटांचे रुग्णालय सुरू केले आहे. मात्र, डॉक्टरांनी या रुग्णालयात सेवा देण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
गोंदियातील कोविड रुग्णालय डॉक्टरांविना बंद कोविड - १९ च्या रूग्णांची संख्या आज ३ हजार ९८७ इतकी पोहचली आहे. त्यातच ५६ जणांना कोरोना मुळे आपले जीव गमवावे लागले आहेत, याची गंभीरपणे दखल घेत प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोविड हेल्थ सेंटर रुग्णालय सुरू केले. या रुग्णालयात १०० बेड तयार करण्यात आले आहेत. तसेच रुग्णांच्या सेवेसाठी १२ डॉक्टर आणि २६ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, रुग्णालय सुरू होउन १० दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप एकाही डॉक्टराने आपली सहमती या कोविड हेल्थ सेंटर रुग्णालयात काम करण्याची दाखवलेली नाही. कोविड रुग्णालयात डॉक्टरांनी सेवा देण्यास नकार दिल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, ईटीव्ही भारत च्या कॅमेरा समोर या विषयवार जिल्हा रुग्णालयाने बोलण्यास नकार दिला आहे.
रुग्णालयात तयार करण्यात आलेले १०० बेड डॉक्टरां अभावी आजही धुळखात आहेत. तसेच दुसरीकडे रुग्णालय प्रशासन आपली चांगली सेवा देण्याचे आश्वासन देत आहे. रुग्णालयाचे दृश्य पाहता कोविड - १९ च्या रुग्णांना आज बेड मिळत नसून त्यांना बेडच्या अभावी उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच कोविड - १९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकाने खासगी रूग्णालयांना गाईड लाईन दिल्या आहेत. या गाईड लाईन प्रमाणे शहरातील सहयोग रूग्णालयात ६६ बेड, सेंट्रल रूग्णालयात ३९ बेड, डॉ. बहेकार रूग्णालयात ३० बेड व के. एम. जे. रुग्णालयात ९ बेड उपलब्ध करून दिले आहे. परंतु या सर्व रूग्णालयांमध्ये कोविड - १९ चे बेड हाऊसफुल झाले आहेत. त्याच पकारे गोंदिया मेडिकल कॉलेज मध्ये सध्या रोजी ९० च्या वर रूग्णांवर उपचार सुरू आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात समर्पित कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात कोरोना रूग्णांसाठी १०० बेड ची सोय करण्यात आली आहे. या रुग्णालयासाठी १२ डॉक्टरांची नेमणूक हि करण्यात आली आहे. परंतु नियुक्त केलेल्या डॉक्टरांनी सेवा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या अभावामुळे कोरोना रूग्णांना त्या रुग्णालयात ठेवले जात नाही. डॉक्टरांच्या नियुक्तीचे प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टरांची नियुक्ती होताच हे रुग्णालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भुषणकुमार रामटेके, जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांनी ईटीव्ही भारतला ऑफ कॅमेरा सांगितली आहे.
हेही वाचा-'रोजगार हा सन्मान, तो देण्यास कधीपर्यंत सरकार मागे हटणार?'